Saturday, March 25, 2023

ज्ञानासाठी शिक्षण का अर्थासाठी शिक्षण, बहुतांची अंतरे , महाराष्ट्र टाईम्स 9 jan 18

माननीय संपादक महोदय',
बहुतांची अंतरे ,
महाराष्ट्र टाईम्स , मुंबई 

आजच्या दृष्टिक्षेपातुन विद्यार्थ्याच्या अपमृत्यूची आकडेवारी प्रत्येक पालकाला हादरवून गेली असेल. भारतात तासाला एक आत्महत्या होताना महाराष्ट्राचा क्रमांक पहिला याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कुणी करायचा याचा विचार ? अनुदान असो वा नसो भरमसाठ डोनेशन घेत प्रवेश द्यायचा आणि पुस्तके वह्या युनिफॉर्म ते सुद्धा आठवड्यात बदलणारे सर्व शाळेतून घ्यायचे. फी चा वाढता आलेख पाहून ज्ञानासाठी शिक्षण का अर्थासाठी शिक्षण हेच कळेनासे झाले आहे. शाळेची शिस्त आणि निकालाची स्पर्धा यामध्ये सापडलेल्या विध्यार्थ्याचे बालपण कधी कोमेजते  हेच कळत नाही. पालक  मुलाला आई बाबा बोलायला लागायच्या आधीच ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गळी उतरवून आपले स्टेटस जपण्याच्या मागे आहेत. कळी उमलायच्या आधीच सुगंध कसा आहे हे सर्वाना सांगण्यात पालक धन्यता मानतात. 
    दुडूदुडू पावलांनी बागडायच्या  वयात अभ्यासाच्या घाण्याला जुंपणे म्हणजे बालमजुरीच्या आरोपाखाली पालकांवर, शिक्षकांवर गुन्हे का दाखल करू नयेत.  कोवळ्या मनावर दिलेले हे ओझे झेपले नाही तर पालवी न फुटलेले रोप कोलमडणारच. याला जबाबदार शालेय शिक्षणातील जीवघेणी स्पर्धा. आणि भली उसकी कमीज मेरी कमीजसे सफेद कैसी या जाहिरातीतील कैच लाईन चा वापर घराघरात होत असताना दिसतो. मूल किंवा मुलगी रूपातील कमीज चमकविण्याच्या नादात अधिक काळवंडले जातात याचा पत्ता लागत नाही. म्हणून मुलांच्या आवडी निवडी त्यांच्या त्या त्या वयात जपण्यात खरे शहाणपण आहे. त्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण द्या. प्रत्येक विषय समजून घेत अभ्यास केला तर ज्ञान आणि मार्क कुठेच जात नाही. फाडफाड इंग्लिश बोलण्यासाठी इंग्रजी माध्यम कशाला हवे. कुटुंबातील व्यक्तीने काही वेळ त्याच्याशी इंग्रजीतून संवाद साधा. त्याला विचार करताना इंग्लिश मधून करू द्या. शब्द संग्रह वाढविण्यासाठी मदत करा . शिक्षणाबरोबर नीतिमूल्ये संस्कार देण्याच्या प्रयत्नाबरोबर सामाजिक व्यवस्थेची जाण त्याच्या मनात रुजवा . अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यांच्या सोबत कार्य करताना विध्यार्थ्याला आपले जीवन घडविण्याची संधी द्या . मग पहा तो आपले आत्मभान घेत यशाच्या उच्च शिखरावर विराजमान होईल. 

                                        विठ्ठल बाबुराव घाडी 
                                        चारकोप, कांदिवली , मुंबई ६७
                                         ८१०८८८८०५६

No comments:

Post a Comment